मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी ठाकरेबंधूंनी आपल्या पक्षांच्या युतीची औपचारिक घोषणा केली. यावरती, ठाकरेबंधूंच्या युतीमुळे कोणताही महत्त्वपूर्ण फरक पडणार नाही, त्यांचे एकत्र येणे हा त्यांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठीचा प्रयत्न आहे, असे त्यांच्या युतीला कमी लेखत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांचा इतिहास भ्रष्टाचार आणि स्वार्थाचा आहे. त्यांची युती ही त्यांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण राजकीय फरक पडणार नाही. जर कोणी वेगळा विचार करत असेल, तर तो बाळबोधपणा आहे. जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. मुंबई आमच्या सरकारसोबत ठामपणे उभी राहील. जनता महायुती सरकारची कामगिरी, भविष्यासाठीची दूरदृष्टी आणि मराठी माणसांना शहरात घरे मिळतील याची खात्री करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाहिल. हा केवळ पोकळ गाजावाजा होता. दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या अशा प्रकारे बातम्या देत होत्या, जणू काही रशिया-युक्रेनची युती झाली आहे. ठाकरे हे मराठी लोकांचे आणि मुंबईचे एकमेव प्रतिनिधी नाहीत. त्यांच्या अहंकारामुळेच मुंबईचे नागरिक त्यांच्यापासून दूर गेले आहेत. मी जन्मजात हिंदुत्ववादी आहे आणि तसाच मरेन. मी भगवी वस्त्रे घालून मतांसाठी राजकीय भूमिका बदलणारा नाही. मुंबई आणि महाराष्ट्राची जनता हिंदुत्ववादी आहे. जे हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून दूर जातात, त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम पाहिला आहे. आमचे हिंदुत्व संकुचित नाही. हीच भारतीय जीवनशैली आहे, असे ते म्हणाले. दरम्यान,मंत्री आशीष शेलार म्हणाले, मराठी मतदार विचारत आहेत की उद्धव आणि राज ठाकरे आधी का वेगळे झाले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा कोणत्याही मराठी माणसाने वेगळा पक्ष स्थापन करण्याची मागणी केली नव्हती. शेलार यांनी मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी दावा केला होता की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती एका टोळक्याने वेढा घातला होता, ज्यामुळे काका-पुतण्यामध्ये दुरावा निर्माण झाला. आज मराठी जनता विचारत आहे की, बाळासाहेबांपासून दुरावा निर्माण करणाऱ्या त्या लोकांची नावे सांगा. राज यांनी या लोकांना कारकून म्हटले होते. आता राज ठाकरे त्याच लोकांशी हात का मिळवत आहेत. त्यांना मिठी का मारत आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला.