मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत असून अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे. काही महापालिकांमध्ये काँग्रेसनेही चांगली कामगिरी केली असली, तरी एकूण चित्र महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंच्या प्रभावामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची कामगिरी लक्षवेधी ठरली असली, तरी भाजप व महायुती बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात भेट देत विजयी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. ‘हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचा विजय’ : रवींद्र चव्हाण कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. बूथ पातळीवर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नसली, तरी त्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका पार पाडली.” पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला योग्य दिशा दिली. संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवण्यात आली आणि त्यालाच जनतेने प्रतिसाद दिला,” असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. ‘बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आपल्याच पाठीशी’ : फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येत आहे. विशेषतः सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार, अशी वाटचाल सुरू आहे. आम्ही या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेऊन गेलो आणि त्यालाच जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.” “लोकांना विकास हवा आहे, म्हणूनच त्यांनी आम्हाला निवडून दिले. या निकालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादही आपल्याच पाठीशी होते,” असेही फडणवीस यांनी सांगितले. ‘हिंदुत्व आणि विकास वेगळे नाहीत’ पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आमचा अजेंडा विकासाचाच आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र हे करत असताना आमच्या विचारांचा आत्मा हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही.” “जो या देशाच्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो, तो आमच्यासाठी हिंदू आहे. एवढे मोठे जनसमर्थन मिळाल्यानंतर अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. उन्माद न ठेवता लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना दिला.