जांबुत : जांबुत – शरदवाडी (ता. शिरूर ) येथे अज्ञात समाजकंटकाकडून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील सुमारे १ हजार ३०० झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला असुन अशा प्रकारे नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जांबुत, शरदवाडी परिसरातील शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात यांनी आपले शेतात दीड वर्षांपूर्वी भगवा जातीच्या तेराशे डाळिंब रोपांची सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड केली होती. लाखो रुपयांचे भांडवल लावून सदर डाळिंब पिकाचा बहर त्यांचेकडून ठेवण्यात आलेला असुन सदर झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागून पुढील तीन महिन्यात सदर डाळिंब फळे काढण्यायोग्य होणार होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटाकाकडून सर्वच १३०० झाडे तोडून टाकण्यात आली असुन यामध्ये शेतकरी थोरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन योग्य तपास करून या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी थोरात यांनी केली आहे. मागील दीड वर्षांपूर्वी शेतकरी दिलीप थोरात व शहाजी थोरात यांनी लागवड केलेल्या भगवा जातीच्या डाळिंब पिकाचा सध्याच्या हंगामात त्यांनी बहर धरलेला असुन पुढील तीन महिन्यात डाळिंब फळे काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकाची अशाप्रकारे समाजकंटका कडून झालेल्या नुकसानीमुळे लागवडपासून आजपर्यंत खर्ची घातलेले भांडवल आणि धरलेल्या बहर या सगळ्याचा विचार करता अंदाजे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. सध्याच्या काळात कांदा पिकासह सर्व शेतमालांचे भाव पडलेले असुन शेतकरी मेटकुटिला आला आहे. लाखो रुपयांचे लावलेला भांडवली खर्च निघने देखील शक्य नसून त्यात अशा प्रकारे लाखो रुपयांचे भांडवल लावून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उध्वस्त व्हायला वेळ लागणार नसल्याने चुकीच्या पद्धतीने नुकसान पोहचविणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.