Delhi Blast Updates : दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने बुधवारी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटप्रकरणातील सात आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १५ दिवसांची वाढ करून त्यांना ८ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांच्यासमोर राष्ट्रीय तपास संस्थेने कडेकोट बंदोबस्तात आरोपींना हजर केले. न्यायालयाने डॉ. आदिल राथर, डॉ. मुजम्मिल गनाई, डॉ. शाहीन सईद, मौलवी इरफान अहमद वागे, जसीर बिलाल वानी, अमीर रशीद अली आणि शोएब यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. यापूर्वी विविध टप्प्यांत या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, ज्याची मुदत बुधवारी संपणार होती. एनआयएच्या तपासानुसार, उमर-उन-नबी हा या कटाचा कथित मुख्य सूत्रधार असून, १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली ह्युंदाई आय-२० कार स्फोटात उडवण्यात आली होती. अमीर रशीद अली याला १६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून, त्याच्यावर स्फोटासाठी वापरलेली कार खरेदी करण्यात मदत केल्याचा आरोप आहे. जसीर बिलाल वानी याला १७ नोव्हेंबर रोजी अटक झाली असून, ड्रोनमध्ये बदल करून तांत्रिक सहाय्य पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शोएबला २६ नोव्हेंबर रोजी अटक झाली असून, त्याच्यावर लॉजिस्टिक सहाय्याचा आरोप आहे. दरम्यान, एनआयएने या कटातील मुख्य आरोपी म्हणून डॉ. नसीर बिलाल मल्ला यालाही अटक केली असून, आणखी एका आरोपीला १८ डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.