नवी दिल्ली : उत्तर भारतात काही ठिकाणी झालेल्या बर्फवृष्टीनंतर अनेक राज्यांत थंडीने हुडहुडी भरली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूरसह सात जिल्ह्यांत थंडीची लाट आली. पंचमढीत यंदा प्रथमच तापमान ५.८ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदविले गेले. दरम्यान, मध्य प्रदेशात गत दोन दिवसांत थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी असून चमोली जिल्ह्यात शेषनेत्र तलाव गोठला आहे. बद्रीनाथ धाममध्ये नोव्हेंबरमधील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. छत्तीसगडमध्ये आगामी तीन दिवस तापमान २ ते ३ अंश सेल्सिअस वाढेल, असा अंदाज आहे. हिमाचलमध्ये दहा शहरांत तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. तर, तीन ठिकाणी तापमान शून्याच्या खाली नोंदविले गेले. हरयाणात काही भागात रविवारी धुके पडले होते. रात्रीचे तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. आगामी तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशात गेल्या १५ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. गेल्या २४ तासांत भोपाळ आणि इंदूरसह सात जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आली. नरसिंहपूरमध्ये दिवसभर थंडी होती. रात्रीही अनेक शहरांमध्ये पारा घसरला. भोपाळ आणि इंदूरसह सात जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तथापि, उद्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्ली एनसीआरमध्ये थंडीचा कडाका होता. दुसरीकडे हवेची गुणवत्ता सातत्याने खराब होत आहे.