अकोला : महापालिकांच्या निकालानंतर महापौरपदासाठी राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, अकोला महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा पेच अधिकच वाढला आहे. निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता एकमेकांविरुद्ध लढलेले पक्षही सत्तेसाठी युतीच्या पर्यायांचा विचार करताना दिसत आहेत. ८० सदस्यांच्या अकोला महापालिकेत बहुमतासाठी ४१ नगरसेवकांची गरज आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने ३८ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने २१ जागांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. बहुमतासाठी केवळ ३ जागांची गरज असल्याने भाजपने थेट ठाकरे गटाच्या शिवसेनेला पाठिंब्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात एका गुप्त ठिकाणी भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे भाजप-ठाकरे गट युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपसमोर उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी ठेवली आहे. अकोला महापालिकेत ठाकरे गटाचे ६ नगरसेवक असून, त्यांच्या भूमिकेकडे आता सत्तेची चावी असल्याचे चित्र आहे. भाजपकडून या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेसनेही सत्तेसाठी हार मानलेली नाही. काँग्रेसकडून ‘प्लॅन बी’ तयार करण्यात आला असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह इतर लहान पक्ष आणि अपक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस (२१), ठाकरे गट (६), शरद पवार गट (३), वंचित (५) आणि एमआयएम (३) एकत्र आल्यास हा आकडा ३८ पर्यंत पोहोचतो. त्यामुळे अनपेक्षित पाठिंब्याच्या जोरावर सत्ता स्थापनेची शक्यता काँग्रेसकडून तपासली जात आहे. अकोला महापालिकेतील बलाबल एकूण जागा : ८० बहुमताचा आकडा : ४१ भाजप : ३८ काँग्रेस : २१ ठाकरे गट (उबाठा) : ०६ शिंदे गट : ०१ अजित पवार गट : ०१ शरद पवार गट : ०३ वंचित : ०५ एमआयएम : ०३ अपक्ष : ०२