Chandrapur kidney racket : चंद्रपूरमधील युवा शेतकऱ्याच्या कर्जफेडीसाठी त्याची किडनी काढण्याची घटना नुकताच उघडकीस आली होती. या प्रकरणात सोलापूरमध्ये एकाला सूत्रधाराला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असून सूत्रधाराचीही किडनी काढण्यात आली आहे. असे असूनही तो इतरांनाही याच मार्गावर ढकलून परदेशात किडनी काढण्याचे रॅकेट चालवत आहे. चंद्रपूर पोलिसांनी सोलापूरमध्ये अटक केलेला कृष्णा मल्लेशम (35) सर्वांना डॉक्टर असल्याची बतावणी करायचा. तो स्वतः किडनी विक्रेता आहे. पैसे कमवण्यासाठी ज्या वेदनादायक अनुभवातून तो गेला होता त्याचा वापर करून तो इतरांचीही फसवणूक करत आहे. डॉक्टर असल्याचे भासवून लोकांना त्यांच्या किडनी विकण्यासाठी परदेशात पाठवणारा कृष्णा मल्लेशम आता पोलीस कोठडीत आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांनी या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नऊ सदस्यांचे विशेष तपास पथक तयार केले होते. सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने, आरोपीचे ठिकाण शोधण्यात आले आणि त्याला सोलापूरमध्ये अटक करण्यात आली. कंबोडिया व्यतिरिक्त ही टोळी इतर कोणत्या देशांशी आणि रुग्णालयांशी जोडलेली आहे याचा तपास पोलिस आता करत आहेत.