BMC Results 2026 । Devendra fadnavis : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) अभूतपूर्व मुसंडी मारली आहे. विशेषतः संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या ‘महायुती’ने विजय मिळवला असून, उद्धव ठाकरे यांच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला मोठा सुरुंग लावला आहे. मुंबईत महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट होताच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना फोन करून त्यांचे विशेष कौतुक केले. या फोन कॉलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोनवर बोलताना फडणवीस म्हणाले, “अमित, तुमचं खूप खूप अभिनंदन! नाही नाही, खूप चांगलं झालं. आता काहीही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही अत्यंत सुंदर काम केलं आहे. आपण आता जबरदस्त करूया!” असं ते म्हणाले. अमित साटम यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली होती. मुंबईतील प्रत्येक प्रभाग पिंजून काढण्यासोबतच, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात साटम आघाडीवर होते. त्यांच्या याच रणनीतीचे फळ आज विजयाच्या रूपाने मिळाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले… भाजपच्या विजयाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘डबल इंजिन सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचे सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, विकसित महाराष्ट्र बनवू शकतं, ग्रामीण भागातूनही असाच निकाल मागच्या वेळी आला होता. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, विकासाचं मत आहे. सध्या हाती आलेला कल आता असाच सुरू राहील आणि महायुती दोन तृतियांश बहुमताने आणि 51 टक्के नगरसेवकांसह भाजप विजय मिळवले असं मला वाटतं. मुंबईत ठाकरेंना मतदारांनी का नाकारलं यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘या पराभवाचं एकच कारण आहे. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचं व्हिजन, एकनाथ शिंदे आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकारवर सरकारने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.’ दरम्यान या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्यासोबत होती. मात्र या आघाडीला आता मुंबईकरांनी नाकारल्याचे समोर आले आहे.