Breaking News । Sonia Gandhi – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवार संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने आज (दि. ६) दिली आहे. सोनिया गांधी यांना खोकला आणि श्वसनाशी संबंधित त्रास असून, वाढत्या प्रदूषणामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे त्यांच्या ब्रॉन्कियल अस्थमाचा त्रास काहीसा बळावला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून एका तज्ज्ञ छातीरोग तज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही एक नियमित तपासणी प्रक्रिया असून त्यांना प्रतिजैविके आणि इतर आवश्यक औषधे दिली जात आहेत. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणा पाहून पुढील एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत डॉक्टर निर्णय घेतील असे सांगण्यात आले.