पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश करत हाती मशाल घेतली आहे. यामुळे ठाकरे गटाची पुणे महापालिकेतील ताकद वाढण्याची शक्यता आहे. कोण-कोण घेतली मशाल? पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटनेचे राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, पक्ष संघटक वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. महापालिका निवडणुकीचा सायरन लवकरच? निवडणूक आयोग सध्या मतदारयाद्या दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटाला मिळालेला हा प्रवेशाचा सिलसिला पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. युती की स्वबळ? नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीतील अनेक पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीतही आघाड्यांमध्ये युती होणार की सर्वच पक्ष स्वबळावर उतरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. स्वतंत्र लढत झाल्यास निवडणूक अजूनच चुरशीची आणि रंजक होईल, अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.