Vijay Wadettiwar : देशाच्या इतिहासात एवढा नालायक व निद्रावस्थेत असलेला निवडणूक आयोग कधीही नव्हता. सध्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे एवढेच त्यांचे काम उरले आहे. मग कुणी काहीही करा. हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहतील. लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची अशी भूमिका असते काय? एखाद्या अधिका-यावर कारवाई करताना दिसत आहे का? निवडणूक आयोग आता भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे हे आता लपून राहिलेले नाही, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी निवडणूक आयोग व भाजपच्या कथित संगनमतावर सडकून टीका केली. ते म्हणाले, सध्या सगळीकडे बोगस मतदान व वोट चोरी सुरू आहे. बिहारच्या एका माजी केंद्रीय मंत्र्याने याविषयी एक धक्कादायक विधान केले आहे. मी २७०० मतांनी हरलो होतो. पण तेथील जिल्हाधिका-यांनी मला जिंकवले, असे तो म्हणाला. यावरून मतचोरीचा अंदाज येतो. हे सर्व काही मतचोरीतून, अधिका-यांवर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जातात. हरणा-यांना जिंकवले जाते. मुंबईत १५ लाख बोगस मतदार आहेत. तिथे एका मतदाराचे ३-४ वेळा नाव आहे. बोगस मतदारांचा आकडा याहून अधिक असू शकतो. त्याची तक्रार केल्यानंतरही निद्रावस्थेत असलेला निवडणूक आयोग काहीच करायला तयार नाही. उलट सत्ताधा-यांना मदत कशी होईल हेच त्याचे चालले आहे. ब्रह्मपुरीतही बोगस आयडी मिळाले. बेइमानी करून निवडणुका जिंकण्याचा एकमेव धंदा आता भाजपने सुरू केला आहे.