Mumbai Municipal Corporation Results। देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून, भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने १०० जागांचा टप्पा पार केला आहे. या जबरदस्त कामगिरीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि मनसे यांच्या ‘युतीला’ला मोठा धक्का बसल्याचे प्राथमिक कलांमधून दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. यावेळी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले, अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. मुंबई महापालिकेतील निकालाचे कल स्पष्ट होताच भाजप आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये नितेश राणे जोरजोरात हसताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ २२ सेकंदाचा आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. तसेच त्यांना खोचक टोला लगावला आहे. ‘उद्धवजी आणि पेंग्विन ला… जय श्री राम!,’ असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. एकीकडे मुंबईतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नितेश राणे यांच्या या प्रतिक्रियेने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.