Mumbai Municipal Corporation Results। देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून, भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने १०० जागांचा टप्पा पार केला आहे. या जबरदस्त कामगिरीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या ‘युतीला’ला मोठा धक्का बसल्याचे प्राथमिक कलांमधून दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. यावेळी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले, अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. बहुतांशी महापालिकांवर भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या या विजयावर आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या पराभवावर भाष्य केले आहे. भाजपच्या विजयाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘डबल इंजिन सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचे सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, विकसित महाराष्ट्र बनवू शकतं, ग्रामीण भागातूनही असाच निकाल मागच्या वेळी आला होता. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, विकासाचं मत आहे. सध्या हाती आलेला कल आता असाच सुरू राहील आणि महायुती दोन तृतियांश बहुमताने आणि 51 टक्के नगरसेवकांसह भाजप विजय मिळवले असं मला वाटतं. मुंबईत ठाकरेंना मतदारांनी का नाकारलं यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘या पराभवाचं एकच कारण आहे. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचं व्हिजन, एकनाथ शिंदे आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकारवर सरकारने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.’ दरम्यान या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्यासोबत होती. मात्र या आघाडीला आता मुंबईकरांनी नाकारल्याचे समोर आले आहे.