BMC Results 2026 – महायुतीतील अंतर्गत फाटाफूट, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची अघोषित आघाडी असूनही भाजपने सांगली महापालिका निवडणुकीत दमदार कामगिरी करत ७८ पैकी ३९ जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी आता शिंदेसेनेकडे मोर्चा वळवला असून, उपमहापौरपदाच्या बदल्यात पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांनुसार, काँग्रेसने खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली १८ जागा जिंकत आपली उपस्थिती भक्कम केली. महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर लढलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १६ जागा मिळवत लक्षवेधी कामगिरी केली. मात्र महापौर आमचाच असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीचा दावा मतदारांनी फेटाळल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजपच्या या यशामागे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी शेखर इनामदार, पालक प्रभारी मकरंद देशपांडे तसेच आमदार सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांची रणनीती निर्णायक ठरल्याचे मानले जाते. भाजपने ५५ जागांचा दावा केला होता, मात्र निकालांनी पक्षाला बहुमताच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. दरम्यान, शिवसेना (शिंदे) गटाचे दोन सदस्य निवडून आल्याने सत्ता स्थापनेची चावी त्यांच्या हाती गेली आहे. भाजप-शिवसेना चर्चेत उपमहापौरपद देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचे समजते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुहास बाबर यांच्यात यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. पक्षनिहाय बलाबल : भाजप ३९, काँग्रेस १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३, शिवसेना (शिंदे) २.