मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदासाठीची चुरस रंगली आहे. 227 जागांच्या मुंबई मनपात भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे महापौर कोण होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निकालानंतर संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. महापौर निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रत्येक पक्ष आपापल्या नगरसेवकांना सांभाळण्यात गुंतलेला दिसत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी “देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल” असे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही “देवाच्या मनात काय आहे ते ठरलेले आहे, महापौर महायुतीचाच होईल” असा दावा केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. नगरविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतरच मुंबईचा महापौर खुर्चीवर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाकडे दोन ‘हुकूमी एक्के’ असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक 53 आणि 121 हे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन्ही प्रभागांत शिवसेना (ठाकरे गट) चे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जर 22 जानेवारीच्या सोडतीत महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठरले, तर उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय फायदा होऊ शकतो. प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी यांनी एकनाथ शिंदे गटाच्या अशोक खांडवेंचा पराभव केला, तर प्रभाग 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे यांनी शिंदे गटाच्या प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे ST आरक्षण निघाल्यास ठाकरे गटाकडे थेट महापौरपदाचा दावा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिका अंतिम निकाल (BMC Election Result 2026): भाजप – 89 शिवसेना (ठाकरे गट) – 65 शिवसेना (शिंदे गट) – 29 काँग्रेस – 24 मनसे – 6 एमआयएम – 8 एनसीपी – 3 एसपी – 2 एनसीपी (शप) – 1 एकूण – 227 आता सर्वांचे लक्ष 22 जानेवारीच्या महापौर आरक्षण सोडतीकडे लागले असून, या एका निर्णयावर मुंबईतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलू शकते.