BMC Election : सत्ताधारी पक्ष आपल्या आणि शिवसेनेच्या नगरसेवंकाचे फोन टॅप करत आहे आणि भाजपच्या नगरसेवकांवर त्याच पक्षाचे कार्यकर्ते पाळत ठेवत आहेत, असा दावा ठाकरेसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने राऊत यांचे आरोप फेटाळून लावत, पक्ष आपल्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत असल्याने असे प्रकार करत नसल्याचे म्हटले आहे. राऊत यांनी दावा केला की, मुंबईचा महापौर दिल्लीत ठरवला जात आहे, जो महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर टीका केली. भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. भाजप स्वतःच्याच नगरसेवकांचे फोनही टॅप करत आहे. एका आलिशान हॉटेलमध्ये ठेवलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे फोनही टॅप केले जात आहेत. मुंबईच्या महापौरपदाची शर्यत तीव्र झाल्याने आणि सत्ताधारी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल सस्पेन्स वाढल्याने, राऊत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रभारी नवनाथ बन यांनी राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्हाला फोन टॅपिंगची गरज नाही, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सत्तेत असताना एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांचे फोन कोण टॅप करत होते, हे राऊत यांनी स्पष्ट करावे. आम्हाला नगरसेवकांचा भक्कम पाठिंबा आहे आणि आम्ही अशा प्रकारच्या कामांमध्ये गुंतलेलो नसल्याचे बन यांनी म्हटले आहे.