मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची होत असताना, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाला निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. भाजपने प्रचारासाठी तयार केलेल्या विशेष गीताला आयोगाने परवानगी नाकारली असून, त्यामुळे पक्षाच्या प्रचार रणनीतीवर परिणाम झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले आहेत, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची २५ वर्षांनंतर आघाडी झाली आहे. प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक असताना आयोगाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एक खास गीत तयार केले होते. या गीतामध्ये भगवा या शब्दाचा उल्लेख असल्याने निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आक्षेप नोंदवला. आयोगाच्या नियमांनुसार प्रचारादरम्यान धार्मिक भावना किंवा विशिष्ट धार्मिक रंगांचा वापर करण्यावर कडक निर्बंध आहेत. त्यामुळे या गीताच्या प्रसारणास आयोगाने मनाई केली. हे गीत प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात साकारण्यात आले होते. अंतिम टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या गीताचा वापर करण्याची भाजपची योजना होती. मात्र, आयोगाच्या निर्णयामुळे ही प्रचार मोहीम थांबवावी लागली असून, निवडणूक प्रचारातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.