Chandrakant Patil : “मुंबईत भाजप ९० जागा आणि शिवसेना ४० जागा मिळवेल. मुंबई, ठाणे पुण्यासह एकूण सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित”, असा मोठा दावा भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशीच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत ५.५ टक्के मतदान पुण्यात नोंदवण्यात आले आहे. अजून मतदान करण्यासाठी बराच वेळ शिल्लक असून, मतदानाची टक्केवारी आणखी वाढणार आहे. नेतेमंडळी देखील मतदान केंद्रांवर येत मतदानाचा हक्क बजावत आहेत. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “2014 साली नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पाच वर्षांमध्ये विकासावर आणि चेहऱ्यावर परिणाम दिसले, त्यामुळे आता होत असलेले आरोप फक्त बुडबुडे आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे. मोदींचे चिन्ह कमळ असो की मोदींचा चेहरा, लोकांचा विश्वास एकसारखा आहे, असेही ते म्हणाले आहेत. पुण्यातबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणाले? पुण्यात जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी भाजपने कंबर कसली. ऐनवेळी अनेक इच्छुकांचा पत्ता कट करून आयारामांना उमेदवारी दिली. यामुळे नाराजीचा सूर उमटला होता. तरीही भाजपने पक्षापुढे काहीही नाही असा कानमंत्र नाराज इच्छुकांना देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पुण्यात काय स्थिती असेल याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात 115 जागांना तर आमच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ज्यांना पैजा लावायच्या असतील त्यांनी खुशाल लावाव्यात, असे थेट आव्हानात्मक विधान पाटील यांनी केले आहे. आमची पार्टी तुटलेली नाही. आमची पार्टी लोकशाही मानणारी आहे. मात्र राज्यातील काही नेत्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्स आणि उर्मटपणामुळे आम्ही काही काळ बॅकफूटवर गेलो होतो, असे मोठे विधान करत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेत भाजपला मिळणाऱ्या जागांबाबत केलेला दावा खरा ठरणार का हे १६ जानेवारीला समजेल. हेही वाचा : लष्कर दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम ; म्हणाले,”प्रत्येक नागरिकाला अभिमान…”