Sanjay Raut : ‘भाजपचे नगरसेवक आणि हॉटेलमध्ये असलेल्या शिंदेंच्या नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत,’ असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीकास्त्र डागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदावरून भाजप शिवसेना महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नगसेवक फुटू नयेत, म्हणून एकनाथ शिंदेंनी हॅाटेल पॅालिटीक्सचे कार्ड खेळले आहे. त्यानुसार त्यांनी शिवसेनेच्या २९ नगरसेवकांना मुंबईतील पंचातारांकित ताज हॅाटेलमध्ये ठेवले आहे. या नगरसेवकांचा मुक्काम आणखी काही दिवस वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे भाजपकडून मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर दावा कायम आहे. असे असले तरी भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही. ११४ हा आकडा पार करण्यासाठी शिंदेंच्या २९ नगरसेवकांची साथ भाजपला घेणे गरजेची असणार आहे. महापौर पद शिवसेनेला मिळाले नाही तरी इतर स्थायी समित्या पदरात पाडून घेण्याचा मानस शिवसेनेचा असणार आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘त्यांना (एकनाथ शिंदे) महापौरपदापेक्षा स्थायी समितीतच अधिक रस आहे.’ पुढे बोलताना राऊत म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा महापौरपदावरील दावा सुटणार नाही. पण अशाप्रकारे ब्लॅकमेक करून काही दुसरे पदरात पाडून घेता येईल का? असा शिंदेंचा विचार आहे. भाजप आपल्या स्वतःच्या नगरसेवकांवर पाळत ठेवून त्यांचे फोन टॅप करत असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? “भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यात सांगितले आहे. ते घरी असले, तरी त्यांच्या लक्ष ठेवले जात आहे. भाजपचे नगरसेवक आणि हॉटेलमध्ये असलेल्या शिंदेंच्या नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत, रश्मी शुक्ला नसल्या, तरी प्रक्रिया तीच आहे. भाजप आपला स्वतःच्या नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे.” मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या दौऱ्यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘दावोसमध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यात मुंबईच्या महापौरपदावरच चर्चा सुरू असते,’ असे राऊत म्हणाले आहेत. हेही वाचा : Side Effects of Energy Drinks: एनर्जी ड्रिंक पिण्याआधी ही बातमी नक्की वाचा; तुमच्या शरीरावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम