Solapur News : महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील राजकारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत शिरले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राज्यभरात अचानक घडामोडी, पक्षांतर आणि एबी फॉर्मसह उमेदवार समोर येत असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून (BJP) झालेल्या एका निर्णयामुळे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा असलेले शिवाजीराव सावंत यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला नसतानाच, त्यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांना भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना नेते तथा आमदार शिवाजीराव सावंत यांच्या छातीवर अखेर भाजपचं कमळ लागलं असून, पृथ्वीराज सावंत हे माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, प्रवेश न होताच थेट उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत आणि पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी अखेर भाजप महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, शिवाजीराव सावंत यांच्या भाजप प्रवेशाला तानाजी सावंत यांनी यापूर्वी विरोध केल्याची चर्चा होती. इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रवेश रोखल्याचा आरोपही राजकीय वर्तुळात करण्यात आला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, अधिकृत प्रवेश न होता थेट भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने तानाजी सावंत यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या संदर्भात बोलताना पृथ्वीराज सावंत यांनी, “विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजप महायुतीसोबत आहोत आणि त्याच भूमिकेतून ही निवडणूक लढवत आहोत,” असे स्पष्ट केले. या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.