अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सुरुवातीला अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिंदे गटाचे पारडे जड झाले होते. मात्र आता अंबरनाथ विकास आघाडीने सर्व नगरसेवकांना व्हिप जारी करत या समीकरणाला पूर्णपणे कलाटणी दिली आहे. अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुळे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट इशारा दिला की, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंबरनाथ विकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करावे लागेल. व्हिप झुगारल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल. आम्ही एकूण ३१ नगरसेवकांना अधिकृत व्हिप जारी केला असून, त्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे करंजुळे यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्याने अंबरनाथमधील राजकीय वातावरण तापले होते. उद्या होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. अंबरनाथ नगर परिषदेत एकूण ५९ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आणि एक अपक्ष नगरसेवक मिळून ३१ सदस्यांचा गट ‘अंबरनाथ विकास आघाडी’ या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणीकृत आहे. शिवसेना (शिंदे गट)कडे २७ नगरसेवक आहेत. चार नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचे पारडे जड झाले होते. मात्र आता नगरसेवकांच्या नावाने थेट व्हिप काढण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.