मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बिहार सरकार अत्याधुनिक आणि भव्य असे ‘बिहार भवन’ उभारणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामुळे मुंबईत बिहार राज्याची प्रशासकीय व सामाजिक उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे. हे भवन पूर्ण झाल्यानंतर मुंबईत येणाऱ्या बिहारवासीयांसाठी ते एक महत्त्वाचे आधारकेंद्र ठरणार आहे. प्रस्तावित बिहार भवन 30 मजली टोलेजंग इमारत असणार असून, बेसमेंटसह एकूण उंची सुमारे 69 मीटर असेल. ही इमारत आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात येणार आहे. सौरऊर्जा पॅनेल, सांडपाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र यांचा यात समावेश असेल. दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवर मुंबईतील हे भवन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. येथे शासकीय कार्यालये, बैठकींसाठी 72 आसनांचे सभागृह, विविध प्रशासकीय विभाग आणि अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलफिंस्टन इस्टेट परिसरात उभारला जाणार असून, यासाठी सुमारे 0.68 एकर (2752.77 चौरस मीटर) जमीन निश्चित करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 314.20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईत रोजगार, व्यवसाय, शिक्षण व उपचारासाठी मोठ्या संख्येने बिहारमधील नागरिक येत असतात. अशा नागरिकांना निवास, मार्गदर्शन व शासकीय मदत मिळावी, या उद्देशाने बिहार भवन उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून, परिसराची सीमा भिंत पूर्ण झाली आहे. सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत बिहार सरकारची प्रशासकीय उपस्थिती अधिक बळकट होणार असल्याचे मानले जात आहे.