Vilas Patil : १६ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांचा निकाल लागला. निकालानंतर यश मिळवलेल्या राजकीय पक्षांनी जल्लोष साजरा केला. आता सर्वच महापालिकेत सत्तास्थापनेसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. या सगळ्यात आता भिंवडीमधून दोन गटात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. या घटनेनंतर विलास पाटील यांनी समर्थकांसह छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. ही घटना राजकीय वैमन्यस्यातून घडल्याची माहिती आहे. पाटील आणि चौगुले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. नेमकं कारण काय? मिळालेल्या माहितीनुसार, भिंवडी महापालिका निवडणुकीत विलास पाटील आणि महेश चौगुले यांची मुलं एकमेकांविरोधात उभी होती. या निवडणुकीत चौगुले यांचा मुलगा प्रभाग क्रमांक १ मधून पराभूत झाला आहे. तर विलास पाटील यांना यश मिळाले आहे. यामुळेच आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर विलास पाटील यांनी प्रशासनवर देखील गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “शंभर जणांनी पोलिसांना घेऊन येऊन माझ्या घरावर दगडफेक केली. माझ्या सुनांंना लहान मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. वाहनांच्या काचा फोडल्या. आत बसलेल्या स्टाफला मारहाण केली. निवडणुकीत पराभूत झाले म्हणून अशा प्रकारची गुंडगुरी पोलिसांसमोर होत होती,” असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. पोलिस त्यांना आत घेऊन जातात आणि बाहेर घेऊन येतात हेच करायचे असेल तर समोर येऊन आम्हाला गोळ्याच घाला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विलास पाटील यांनी दिली आहे. दोन्ही गटात झालेल्या राड्यात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. सध्या भिवंडीत तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस काय म्हणाले? याबाबत पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी माहिती देत दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्यात आली. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बोराटे यांनी दिली आहे. हेही वाचा : Vidarbha Champion : विदर्भाचा ऐतिहासिक पराक्रम! पहिल्यांदाच कोरलं ‘विजय हजारे ट्रॉफी’वर नाव; बलाढ्य सौराष्ट्रला चारली धूळ