नाशिक : राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचा माहोल आहे. सध्याच्या घडीचे राजकारण पाहता अनेक मोठ्या घडामोडी निवडणुकीत घडताना दिसत आहेत. आज ठाकरे बंधू यांचा मुंबई महापालिका निवडणुकसाठीचा वचननामा जाहीर होणार आहे. अशातच दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. सुजाता डेरे यांना मनसेकडून तिकीट मिळाले असतानाही त्यांनी हाती कमळ घेत राज ठाकरेंच्या मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थित सुजाता डेरे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. डेरे भाजपात जाणार असल्याने राज ठाकरे यांच्या मनसेसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून मुंबईतील शिवसेना भवनात ठाकरे बंधू अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वचननामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने अवघ्या मुंबईकरांचे लक्ष याकडे लागले आहे. या वचननाम्यातून कोणत्या घोषणा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करणार याकडे देखील लक्ष असणार आहे. याशिवाय तब्बल २० वर्षांनी पहिल्यांदाच राज ठाकरे हे शिवसेना भवनात येणार असल्याने ही एक अत्यंत महत्वाची घडामोड असणार आहे. हेही वाचा : “एकतर्फी हल्ला करणे हे युद्धाचे कृत्य”; मादुरो यांच्या अटकेवरून न्यूयॉर्कचे महापौर ममदानी भडकले