Nationalist Congress Party : राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकांनतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या मोठ्या हालचालींना वेग आला आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिका या नेत्यांचाही समावेश आहे. स्टार प्रचारकांची नावे : वरील बड्या नेत्यांशिवाय पक्षातील इतर नेत्यांनाही मैदानात उतरवण्यात येणार आहे. खासदार सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार नितीन पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, आमदार शेखर निकम, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार अनिकेत तटकरे, आमदार सना मलिक-शेख, आमदार सतीश चव्हाण, आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रम काळे,माजी आमदार झिशान सिद्दीकी, आमदार इद्रीस नायकवडी,अल्पसंख्याक नेते हाजी ईस्माईल शेख, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, प्रदेश प्रवक्ते प्रतिभा शिंदे, अल्पसंख्याक नेते नजीब मुल्ला, विकास पासलकर आदींचा समावेश आहे. वाटचाल कशी असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मैदान मारण्यात यश मिळाले असे बोलणे वावगे ठरणार नाही. पण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे अपेक्षित यश होते ते मिळाले नसल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले आहे. खरंतर अजित पवार यांनी स्वतः स्टार प्रचारकाच्या भूमिकेत उतरून विविध ठिकाणी प्रचारदौरे केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : “जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्या”; बड्या नेत्याची निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी