Eknath Shinde | Ajit Pawar | Asaduddin Owaisi – अकोटमध्ये भाजप आणि एआयएमआयएमची युती झाल्याचा राजकीय धुरिणांना धक्का बसलेला असतानाच बीडमधील नवीन समीकरणामुळे सत्तेचा अजब खेळ पाहावयास मिळाला. परळी नगरपरिषदमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चक्क एमआयएमला सोबत घेऊन आपला गट स्थापन केला आहे. या नव्या समीकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे. परळी नगरपरिषदेत एकूण 35 नगरसेवक आहेत. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. आता नगरपरिषदेत गट नेत्याची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपली ताकद एकत्र केली. या प्रक्रियेत त्यांनी एमआयएमच्या एका नगरसेवकाला आणि काही अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतले आहे. या नव्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, शिवसेनेचे 2, एमआयएमआयएमचा 1 आणि 4 अपक्ष अशा एकूण 24 नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची या गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अकोट आणि अंबरनाथचे प्रकरण शांत होत नाही तोच परळीत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने एमआयएमला सोबत घेतल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे.