Ashish Shelar | Vinod Tawde | बिहार राज्यातील बांकीपूर मतदार संघातून चार वेळा आमदार राहिलेले आणि मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळणारे तसेच पक्षातील विविध पदे भूषविणारे नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदांची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पक्षातील बड्या नेत्यांसह राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर नितीन नबीन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शोभा करंदलाजे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. तसेच मंत्री आणि मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांची तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. बंगळूर महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी राम माधव, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर असणार आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नबीन यांनी हे निर्णय घेतले आहेत. कोण आहे नितीन नबीन? 23 मे 1980 रोजी नितीन नबीन यांचा जन्म झाला. झारखंडची राजधानी रांचीचे ते रहिवासी आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हेही भाजप आमदार होते. 2006 मध्ये वडिलांच्या निधनानंतर नबीन राजकारणात सक्रीय झाले. 2006 मध्ये पोटनिवडणुकीद्वारे प्रथमच बिहार विधानसभेवर निवडून आले. 2010, 2015, 2020, 2025 अशा चार वेळा बांकीपूरचे आमदार आहेत. रस्ते वाहतूक, नगरविकास, गृहनिर्माण, विधी व न्याय खात्याचे मंत्री राहिले आहेत. भाजयुमोचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीमचे प्रभारी, छत्तीसगडचे सहप्रभारी होते. डिसेंबर 2025 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 20 जानेवारी 2026 पासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा औपचारिक पदभार त्यांनी स्विकारला आहे. हेही वाचा : Pune : शुल्कवाढीचा चेंडू नव्या कारभाऱ्यांच्या कोर्टात; जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दराचा निर्णय