नाशिक : राज्यातील महापालिका निवडणुकीत शाई प्रकरणामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मतदान करण्यासाठी बोटावर लावण्यात आलेली शाईसाठी पेनाचा वापर केला जात आहे. ही शाई पुसणे सोपे असून त्यामुळे दुबार मतदारांची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक वेगळाच प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २४ मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप करण्यात आला आहेत. धनुष्यबाण या चिन्हासमोर बटण दाबल्यानंतर मशीनवर भाजपच्या चिन्हाची लाईट लागत असल्याचा दावा शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांकडून करण्यात आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यामधून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणामुळे काही काळ मतदान केंद्राबाहेर गर्दी वाढली होती आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. हा प्रकार प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर घडला असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्यभरात आज २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत राज्यभरात एकूण २,८६९ जागांवर उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत. तर तब्बल ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, विविध केंद्रांवर मतदान यंत्रणेबाबत समोर आलेल्या तक्रारी चर्चेला विषय ठरत आहेत. नाशिकसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई अशा विविध ठिकाणी ईव्हीएम मशिनबाबत अनेक तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पार्दर्शकपणे पाडण्यासाठी अतिरिक्त दक्षता आयोगाकडून घेतली जात आहे. हेही वाचा : Hemant Dhome: “मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी मतदान करा”; हेमंत ढोमेची भावनिक साद