नाशिक : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं नाव समजले जाणारे माणिकराव कोकाटे यांना १९९५ चे सदनिका प्रकरण भोवले आहे. ऐन निवडणुकीच्या काळातच या प्रकरणावर मोठा निर्णय देण्यात आला आहे. खोट्या कागदपत्रांचा वापर करून स्वतःला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखवले आणि मुख्यमंत्री कोट्यातील १० टक्के आरक्षणाचा लाभ घेत नाशिक येथील उच्चभ्र ठिकाणी सदनिका बळकावल्या, असा आरोप कोकाटे यांच्यावर असून या प्रकरणात नाशिकच्या प्रथम वर्ग आणि जिल्हा सत्र न्यायालयाने या दोन्ही न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली आहे. आता कोकाटे यांनी या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्यांच्यावर अटकेची टांगती तलावर कायम असून त्यांची आमदाराकीही रद्द होऊ शकते. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी पक्षासाठी आणि पर्यायाने अजित पवार यांच्यासाठी ही धक्कादायक बाब म्हणावी लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे मोठे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल आहेत. नाशिक जिल्ह्यातील ही दोन मोठं नाव वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. परिणामी नाशिकच्या गडासाठी राष्ट्रवादीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. माणिकराव कोकाटे हे आधीपासून विविध विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठविण्यात आली. त्यांनंतर त्यांचा विधिमंडळातील वरिष्ठ सभागृहात अधिवेशन काळातील मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण त्यांचा राजीमाम्याऐवजी त्यांच्यावर दुसऱ्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यावरून महायुती सरकावर देखील मोठी टीका करण्यात आली होती. कृषीखाते कोकाटेंपासून काढून त्यांना क्रीडाखाते देण्यात आले. आता सदनिका प्रकरणी त्यांच्या अडचणी वाढल्या असून, मंत्रीपद काढून घेण्यात आले असून, आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे कोकाटे यांची भविष्यातील राजकीय कारकीर्द अंधातर झाली आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठं नाव ते प्रकृतीच्या कारणास्वत रुग्णालयात दाखल झाले असून उपचार घेत आहेत. ओबीसीच्या आरक्षणावर गद्दा येत असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आपल्याच सरकारला त्यांनी घरचा आहेर दिला. एका नेत्यावर सदनिका लाटल्याचा आरोप तर दुसरा नेता रुग्णालयात अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पुढे निवडणुकीच्या काळात मोठं आव्हान आ वासून उभे राहिले आहे. महापालिका आणि पाठोपाठ येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाशिकचा गड गमावण्याचेही संकट पक्षासमोर आहे. या सगळ्या घडामोडी पाहता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काय करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : “दोन वर्षात दोन विकेट..”; कोकाटे प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा CM फडणवीसांवर हल्लाबोल, केली ‘ही’ मोठी मागणी