Sindhudurg News : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून हालचालींना वेग आला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतील एक महत्वाचा टप्पा असणार आहे. अशातच सिंधूदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या जागा वाटपाचा फॅार्म्युला जाहीर होताच एक मोठी घडामोड घडली आहे.

ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ओरोस मंडळातील इतर 42 प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीकडून व्यूहरचना आखली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कणकवलीत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठीकत खासदार आणि भाजप नेते नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसोबत तसेच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.

नुकतेच ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपला राजीनामा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सोपवला. त्यानंतर ओरोस मंडळातील इतर ४२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत, अशी माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच भाजपमध्ये बंडाचे निशाण फडकल्याने मोठा पेच भाजपसमोर उभा राहिला आहे. अंतर्गत नाराजीमधून बंडाचे निशाण पदाधिकाऱ्यांनी फडकवल्याचे सांगितले जात आहे.

‘या’ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा देणाऱ्यांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, युवा मोर्चाचे जयेश चिंचळकर आणि अनुसूचित जाती मोर्चाचे सुनील जाधव यांसारख्या महत्त्वाच्या एकूण 43 पदाधिकाऱ्यांनी, ज्यात बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्रप्रमुखांचाही समावेश आहे.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीनंतर आता १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली असून २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होईल, तर २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २८ जानेवारीला दुपारी साडेतीनंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ५ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होऊन साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.

हेही वाचा : Kangana Ranaut: ‘छावा’वरील विधानावर कंगना रनौतचा ए. आर. रहमानवर घणाघात, “द्वेषाने आंधळे झाले”