आळंदी : आळंदी हे संतपरंपरेचे व वारकरी संस्कृतीचे केंद्र आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, भूमिगत गटारे, आरोग्य सुविधा तसेच पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल. भाविकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. आळंदीतील शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा संकल्प आहे, असे मनोगत नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे यांनी व्यक्त केले. आळंदीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. या समारंभास शांतीब्रह्म मारुती महाराज कुर्हेकर, डॉ. नारायण महाराज जाधव, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ, आजी-माजी पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे मान्यवर तसेच मोठ्या संख्येने आळंदीकर नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन दिव्यांग भगिनींच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता व सर्वसमावेशक विकासाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आळंदीचा विकास करताना तिची आध्यात्मिक ओळख जपली पाहिजे. नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देईल. शासनाच्या विविध योजनांमधून आळंदीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शहराच्या नियोजित, सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. आळंदीचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता भाविक-केंद्रित आणि पर्यावरणस्नेही असेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष कुर्हाडे यांनी केले. पदग्रहण सोहळ्यात भावुक क्षण आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित तरुण, तडफदार आणि सदैव हसतमुख नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे पाटील पदग्रहण समारंभात भावूक झाले. गेली दहा वर्षे अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी असलेले प्रशांतदादा संपूर्ण पदग्रहण सोहळा पार पडेपर्यंत खुर्चीवर न बसता, सर्वप्रथम आई-वडिलांचा आशीर्वाद घेणारे नगराध्यक्ष ठरले. नगरपालिकेकडून त्यांच्या दालनापर्यंत सुमारे 100 मीटर अंतरावर पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत करण्यात आले. हेच माझे भाग्य, असे उद्गार त्यांनी प्रथमदर्शनी काढले. फोटो ः प्रशांत कुर्हाडे