Bangladesh refuse to play T20 World Cup 2026 in India : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेपूर्वी आयसीसी आणि बीसीबी यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुढे करत आपले सर्व सामने भारतात खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हे सामने स्पर्धेचा सह-यजमान असलेल्या श्रीलंकेत हलवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी बांगलादेशने केली आहे. या भूमिकेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट संबंधांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नेमकं प्रकरण काय? मुस्तफिजुर रहमानच्या आयपीएल प्रकरणावरून सुरू झालेला तणाव आता टोकाला पोहोचला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या संघासाठी भारत दौरा करणे योग्य नाही. विशेष म्हणजे, बांगलादेशचे तीन महत्त्वाचे सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणि एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नियोजित आहे. मात्र, आता बीसीबीने या ठिकाणी खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे. आयसीसीसमोर कोणते पर्याय आहेत? या पेचप्रसंगामुळे आयसीसी सध्या तीन प्रमुख पर्यायांचा विचार करत असल्याचे समजते: १. मागणी मान्य करणे: स्पर्धेत व्यत्यय येऊ नये म्हणून बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत हलवणे (जसे यापूर्वी पाकिस्तानच्या बाबतीत काही वेळा घडले आहे). २. वॉकओव्हर (Walkover): जर आयसीसीने सामने हलवण्यास नकार दिला आणि बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांना (वेस्ट इंडिज, इंग्लंड, इटली आणि नेपाळ) न खेळताच विजयी गुण दिले जातील. ३. स्पर्धेतून हकालपट्टी: बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढून दुसऱ्या एखाद्या संघाला संधी देणे. हेही वाचा – BCB Demand ICC : विश्वचषकाआधी क्रिकेट विश्वात खळबळ! भारताकडून सामने हिरावून घेण्याची बांगलादेशची मागणी बांगलादेशच्या जागी कोणाला मिळणार संधी? जर बांगलादेशने माघार घेतली, तर त्यांच्या जागी कोणत्या संघाला संधी द्यायची, यावरही चर्चा सुरू आहे: स्कॉटलंड: जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानावर असल्याने स्कॉटलंड प्रबळ दावेदार आहे. यापूर्वी २००९ मध्ये झिम्बाब्वेने माघार घेतल्यावर स्कॉटलंडलाच संधी देण्यात आली होती. जर्सी: जर क्वालिफिकेशन राउंडचा विचार केला, तर युरोप रीजनल फायनलमध्ये जर्सीचा संघ स्कॉटलंडपेक्षा सरस ठरला होता. त्यामुळे नियमांनुसार जर्सीला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचा – Ishan Kishan Dropped : इशान किशनवर अन्याय? शतकी खेळीनंतरही संघात स्थान नाही; कोणाच्या सांगण्यावरून डावललं? भविष्यातील धोका आणि ऐतिहासिक निर्णय – एकदा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर एखाद्या देशाच्या हट्टापायी ठिकाण बदलणे हे भविष्यातील स्पर्धांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे इतर देशही अशाच प्रकारची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयसीसी बांगलादेशची मागणी मान्य करून तडजोड करते की कठोर निर्णय घेऊन नवीन आदर्श घालून देते, याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष लागले आहे.