Bajaj Pune Grand Cycle Tour । Accident news – पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गंभीर घटना आज मुळशी तालुक्यात घडली. ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी–कोळवण रस्त्यावर झालेल्या साखळी अपघातात ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले, यामध्ये अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा कोळवण रोडवरून सुरू असताना, रस्त्याची रुंदी अचानक कमी झाल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना अरुंद रस्ता आणि तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटला. यानंतर मागून येणारे खेळाडू एकामागोमाग एक एकमेकांवर आदळले आणि काही सायकलपटू ट्रॅकच्या बाहेर फेकले गेले. या साखळी अपघातात अनेक खेळाडूंना किरकोळ दुखापती झाल्या असून ४ ते ५ सायकलपटूंना गंभीर जखमा झाल्याने त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. घटनेनंतर सुमारे १५ मिनिटांसाठी स्पर्धा थांबवण्यात आली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रेस पुन्हा सुरू करण्यात आली. प्रशासनाच्या नियोजनावर संताप.! आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करताना रस्त्यांची भौगोलिक स्थिती, अरुंद वळणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा योग्य अभ्यास करण्यात आला होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोळवण रोडवरील अरुंद भागाची पूर्वसूचना खेळाडूंना देण्यात आली नव्हती, असा आरोप केला जात आहे. तसेच वळणावर आवश्यक असणारी बॅरिकेडिंग, धोक्याच्या सूचना देणारे फलक आणि सुरक्षाकर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचेही दिसून आले.