मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदावरुन सध्या प्रचंड रस्सीखेच सुरु आहे.या निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी महापौर पदावर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल, असे वक्तव्य केल्याने सस्पेन्स वाढला होता. तसेच, मुंबईत पडद्यामागे गुप्तपणे वाटाघाटी सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून शिंदेसेनेच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या दाव्होस आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले आहेत. या काळात दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ठाकरेसेनेकडून आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची कुणकुण लागल्याने एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँडस् एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याची माहीती आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापना होईपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच ठेवले जाणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांना धोका असला तरी त्याचवेळी त्यांच्यासमोर नवी संधीही निर्माण झाली आहे. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आल्याने त्यांना 114 हा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. हीच गरज ओळखून शिंदे यांच्याकडून अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची समान वाटणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात करावी. तसेच स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माहितीनुसार, शिंदेसेने काही नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असुन, या नगरसेवकांनी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केल्याची माहिती आहे. आमच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही,असे या नगरसेवकांनी सांगितल्याचे समजते.