कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रचार प्रमुख सचिन पोटे हे समर्थक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षांतील काही माजी नगरसेवक आणि प्रमुख राजकीय नेते सचिन पोटे यांच्या संपर्कात आहेत. ते सर्वजण एकत्रितपणे शिंदे गटात सामील होण्याची दाट शक्यता आहे. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्याच महिन्यात सचिन पोटे यांच्यासह अनेक समर्थकांनी काँग्रेसमधील पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून त्यांना पक्षात खेचण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, सचिन पोटे यांनी शिंदे गटालाच प्राधान्य दिले असल्याचे समजते. या घडामोडीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारणात नवे वळण येऊ शकते. सचिन पोटे यांचा प्रवेश झाल्यास शिंदे गटाची स्थानिक ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे.