नवी दिल्ली – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे (मनरेगा) नाव बदलणे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दुसऱ्यांदा हत्या करण्यासारखे आहे अशी टीका कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. मनरेगा अंतर्गत, सरकार ग्रामीण भागात १०० दिवसांच्या कामाची हमी देते आणि काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देखील देते. नवीन विधेयकात १०० दिवसांची हमी १२५ दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, तर इतर दोन अटी तशाच राहतील. मात्र विरोधी पक्षांचा आरोप आहे की सरकारने आणलेले नवे विधेयक केवळ नाव बदलण्यापुरते मर्यादित नाही तर योजनेच्या मूलभूत रचनेतही मोठे बदल करत आहे. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, जवाहरलाल नेहरूंना अनेक वर्षे बदनाम केल्यानंतर, ते आता महात्मा गांधींना लक्ष्य करत आहेत. देशातील लहान मुलांना महात्मा गांधींबद्दल माहिती नसावी असे केंद्र सरकारला वाटते. ते भारतातील लोकांच्या स्मृतीतून महात्मा गांधींचे नाव पुसून टाकू इच्छितात.