कोल्हापूर : कोल्हापुरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन घरी निघालेल्या आई आणि तिचे सात दिवसाचे नवजात बालक या दोघांचाही अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात चंदगड-गडहिंग्लज महामार्गावर झाला आहे. सुवर्णा कुंदेकर असे मृत महिलेचे नाव असून दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी कार पेटवून दिली. ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. महिला आणि तिच्या सात दिवसाच्या मुलाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. नेसरी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर सहायक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांची पोलीस कंट्रोल रूमला तडकाफडकी बदली करण्यात आली. आमदार शिवाजी पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा अपघात केवळ वाहनांचा धक्का नव्हता, तर एका कुटुंबाच्या आयुष्यावर कोसळलेला काळाचा घाव होता.