मुंबई : राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शनिवारी (२० डिसेंबर २०२५) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान सुरू होते. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान चालू राहिले. मात्र, अंबरनाथ,धर्माबादसह काही ठिकाणी बोगस मतदान, पैशांचे आमिष आणि राड्याच्या घटनांनी निवडणुकीला गालबोट लागले. रविवारी (२१ डिसेंबर) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर होणार आहेत. अंबरनाथमध्ये बोगस मतदानाचा गदारोळ अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत सकाळीच खळबळ उडाली. भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेवर २०८ हून अधिक बोगस मतदार आणल्याचा आरोप केला. कोहोजगाव परिसरातील एका सभागृहात शेकडो महिला गोळा केल्याचा दावा करण्यात आला. या महिलांना बोगस मतदानासाठी आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी या महिलांची चौकशी सुरू केली असून काही ठिकाणी तणाव निर्माण झाला. मातोश्री नगर परिसरात पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तसेच, ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस ओळखपत्रे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पैशांचे वाटप आणि ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचेही आरोप झाले. धर्माबादमध्ये महिलांना मंदिर-मंगल कार्यालयात डांबले नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये मोठा राडा झाला. पैशांचे आमिष दाखवून शेकडो महिलांना मंदिरात आणि इनानी मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप झाला. प्रसादाच्या स्वरूपात ४००० रुपये देण्याचे सांगून कुंभार समाजातील महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा दावा महिलांनी केला. तेलंगणातील मतदार आणून बोगस मतदान केल्याचा आरोपही करण्यात आला. बोगस मतदानाच्या संशयातून एका महिला आणि पुरुषाला मारहाण झाली. जमाव जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. नंतर डांबून ठेवलेल्या महिलांची सुटका करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगल कार्यालयाची पाहणी केली असता गैरप्रकार आढळला नाही, असे सांगितले. कोल्हापूरात गडहिंग्लजमध्ये वाद कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या एमआर हायस्कूल मतदान केंद्रावर राडा झाला. गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना मतदान केंद्रात सोडल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. कोपरगावात गोंधळ, बारामतीत बोगस मतदान कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर प्रभाव टाकल्याचे आरोप झाले. एस.जी. महाविद्यालय मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला. बारामतीत अहिल्यानगर देवी क्लब केंद्रावर एका मतदाराचे मत आधीच कोणी तरी टाकल्याचे समोर आले. अमित दिलीप कुलथे यांना टेंडर वोट देऊन मतदान करता आले. फुलंब्रीत जादूटोणा, सिन्नरमध्ये बोगस मतदार छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत भारत माता शाळा केंद्राबाहेर काळी बाहुली, लिंबू आढळले. नाशिकच्या सिन्नरमध्ये बनावट आधारकार्ड वापरून भावाच्या नावाने मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या बोगस मतदाराला पकडले. या घटनांमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असला तरी आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले. उद्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.