Jayant Patil : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात आरोपांची राळ उठवताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजप यांच्यात महापालिका निवडणुकीत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपवर टीका करताना दिसत आहेत. भाजपच्या नेत्यांकडून टीकेला जशात तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. राज्यात महायुती म्हणून असलेली राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात पालिका निवडणुकीत मात्र सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. या सुरू असलेल्या राजकारणावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. जयंत पाटील यांनी वर्तवले भाकित दोन मोठे पक्ष आणि नेते हे एकमेकांवर टीका करत आहेत. त्यावेळी मीडियाची स्पेस ते घेत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना स्पेस उरत नाही. तसा भाग असू शकतो, अशी शक्यता जयंत पाटील यांनी अजित पवार आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर वर्तवली आहे. ते असेही म्हणाले की, पण मला वाटत नाही की अजितदादा प्लॅनमध्ये सहभागी होत असतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे आगामी काळातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरून लागली असून, यावर देखील जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. मी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत गुंतलेला आहे. त्यामुळे मला राज्यस्तरावर काय चालले आहे याची माहिती नाही. तशी चर्चा माझी कोणाशी झालेली नाही. त्यामुळे यावर भाष्य करणं उचित होणार नाही, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. सांगली-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ जयंत पाटील स्वतः मैदानात उतरले आहेत. जोरदार प्रचारमोहिम शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राबविली जात आहे. सांगली-कुपवाडा महापालिकेसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. भाजपच्या जागा निवडणुकीत येणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. हेही वाचा : जनगणनेची तारीख जाहीर ! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार जातगणना ; पहिल्या टप्प्यात कुटुंब तर दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची गणना होणार