Ravindra Chavan : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका करत भष्ट्राचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी केलेल्या या आरोपांना आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण? रवींद्र चव्हाण म्हणाले, अजित पवार यांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीसांना, ‘पुन्हा एकदा विचार करा’, असा सल्ला दिला होता. ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्यासोबत जोडली गेली आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना खासगीत नेहमी सांगायचो, ‘साहेब थोडा विचार करा.’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे कार्यकर्ते मला रोज सांगत आहेत. त्यामुळे थोडासा विचार करा, असे मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बोललो होतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. अजित पवारांनी ध्यानात ठेवावे अजित पवारांच्या भष्ट्राचाराचा गंभीर आरोपावर रवींद्र चव्हाण म्हणाले, सर्वप्रथम त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे, अशा शब्दांत चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुढे ते म्हणाले, खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, असा थेट इशारा देत याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले ऐन महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून, आरोप प्रत्यारोपाचे राजकारण भाजप राष्ट्रवादीमध्ये सुरू झाले आहे. अजित पवार यांच्या आरोपांनंतर रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात स्थानिक निवडणुकांवर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे, अशी चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपसाठी पुणे महापालिका निवडणूक आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाच्या आहेत. यावर भाष्य करताना रवींद्र चव्हाण यांनी यंदाची निवडणूक ही पुण्याच्या विकासासाठी आहे. येथील जनतेला नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकते, याचा प्रश्न आहे. हेच सांगायला मी इथे आलो आहे, असे ते म्हणाले. अजितदादांना एजन्सी सल्ला देते अजित पवार हे तसे चांगले आहेत. पण काही एजन्सी त्यांना खोटे नरेटिव्ह कसे पसरवायचे, यासाठी स्क्रिप्ट लिहून देतात. अजितदादांनी कोणता शर्ट घालायचा, यासाठीही एजन्सी सल्ला देते. पण अजित पवार हे आमच्यासोबत केंद्र आणि राज्यात जोडले गेले आहेत. पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अजित पवार हे एजन्सीने त्यांना सल्ला दिल्याशिवाय खोटे आरोप करणार नाहीत.