शिरूर : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होणार असून प्रत्येक पक्षाकडून ताकत लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रचार जोमात सुरू असून तरूण, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेल्या एका उमेदवाराने दोन वेळा उपनगराध्यक्ष पद भूषवूनही स्वतःच्या प्रभागाचा विकास न केल्याची टीका जनतेतून होत आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज समस्या, गटारांच्या तक्रारी आणि मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रभागातील प्रश्न निकाली लागले नसताना त्यांनी तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्याने नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याउलट, ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचाराला प्रचंड गर्दी होत असून शहराच्या सर्व भागातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रलंबित कामे, जलव्यवस्था, स्वच्छता, स्मार्ट रस्ते, महिला संरक्षण, क्रीडा-सांस्कृतिक विकास आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या विषयांवर त्यांनी निर्णायक भूमिका घेतल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रचारादरम्यान ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या, “शिरूर शहराचा सर्वांगीण विकास हा एकमेव ध्यास आहे. गेल्या काही वर्षांत प्रलंबित राहिलेल्या योजनांना गती देऊन शहराला आधुनिकतेकडे नेणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.” शिरूरच्या राजकारणात नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळावी, ही मागणी जोर धरत असून पंचरंगी लढतीत ऐश्वर्या पाचर्णे या निर्णायक स्पर्धक आहेत. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक जोरदार होण्याचे संकेत आहेत.