पुणे : पुणे महापालिकेचा निकाल जाहीर होताच भाजपने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा मोठा निर्णय घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाने दिले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महापालिकांच्या निकालात भाजपने दणदणीत यश मिळवले असून मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का दिला आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपाचाच महापौर बसणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर आता भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीतही अजित पवार गटापासून स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचा ‘स्वबळाचा’ नारा महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत असूनही सोबत घेतले नव्हते. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली, मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. याच पार्श्वभूमीवर आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी X वर म्हटले आहे की, “पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज माझ्या व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनिती, संघटनात्मक मजबुती आणि उमेदवार निवडीबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. पुणे जिल्हा परिषद निवडणूक भाजपने स्वबळावर लढवावी, असा ठाम व एकमुखी सूर या बैठकीत उमटला.” या बैठकीस पुणे उत्तर व पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष, वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम अर्ज दाखल करण्याची मुदत: 16 जानेवारी ते 21 जानेवारी अर्जांची छाननी: 22 जानेवारी उमेदवारी माघारीची अंतिम मुदत: 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह: 27 जानेवारी, दुपारी 3.30 नंतर मतदान: 5 फेब्रुवारी, सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 मतमोजणी व निकाल: 7 फेब्रुवारी, सकाळी 10 वाजल्यापासून