ACA 4 players suspended : आसाम क्रिकेट असोसिएशन (ACA) ने मोठी कारवाई करत चार क्रिकेटपटूंना भ्रष्ट आचरणाच्या आरोपाखाली तात्काळ निलंबित केले आहे. या खेळाडूंनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ दरम्यान गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी आसामचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यांच्यावर राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे (Crime Branch) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सहभागी असलेल्या आसामच्या काही खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि त्यांना गैरकृत्यांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या चौघांनी केल्याचा आरोप आहे. एसीएचे सचिव सनातन दास काय म्हणाले? एसीएचे सचिव सनातन दास यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोप समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटने (ACSU) या प्रकरणाची चौकशी केली. एसीएने देखील या संदर्भात कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत गंभीर गैरवर्तन झाल्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे खेळाच्या निष्पक्षतेवर आणि सचोटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हेही वाचा – मेस्सी मैदानात आला अन् ‘या’ कारणामुळे चाहते संतापले; थेट बाटल्या अन् खुर्च्या फेकत घातला गोंधळ चारही खेळाडू निलंबित – सनातन दास यांनी स्पष्ट केले की, “परिस्थिती आणखी बिघडवण्याची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी या चारही खेळाडूंना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीचा अंतिम निकाल लागेपर्यंत किंवा असोसिएशनने पुढील निर्णय घेईपर्यंत हे निलंबन कायम राहील.” निलंबनाच्या काळात हे चारही खेळाडू एसीए, त्यांच्या जिल्हा युनिट्स किंवा संलग्न क्लब्सद्वारे आयोजित कोणत्याही राज्य-स्तरीय स्पर्धा किंवा सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. तसेच, मॅच रेफरी, प्रशिक्षक किंवा पंच अशा कोणत्याही क्रिकेट-संबंधित गोष्टीमध्ये सहभागी होण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे. हेही वाचा – फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कोलकत्यात 70 फुट उंच पुतळ्याचे केलं अनावरण, चाहत्यांची अलोट गर्दी; ‘या’ दिवशी येणार मुंबईत एसीएने सर्व जिल्हा संघटनांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची आणि त्यांच्या अखत्यारीतील क्लब्स व अकादमींना या निर्णयाची माहिती देण्याची सूचना केली आहे. आसामचे सय्यद मुश्ताक अली लीग सामने २६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत लखनऊ येथे आयोजित करण्यात आले होते, परंतु संघ सुपर लीग टप्प्यात पोहोचू शकला नाही. भारतीय संघाचा स्टार खेळाडू रियान पराग देखील याच आसाम संघातून खेळतो.