Asaduddin Owaisi Solapur Speech : सोलापूरमध्ये एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी महायुती, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल,” असा ठाम विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला. सोलापुरात अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एमआयएम यांच्यात थेट लढत सुरू आहे. एमआयएमचे माजी शहराध्यक्ष आणि सध्या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणारे तौफिक शेख यांच्या विरोधात ओवैसी यांनी सभा घेतली. अजित पवार म्हणजे मोदींना मत : ओवैसी अजित पवारांवर टीका करताना ओवैसी म्हणाले, अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे. अजित पवारांच्या पक्षाला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवार मोदींच्या गोदीत बसले आहेत. मोदी, शिंदे आणि अजित पवार ही त्रिमूर्ती एकच आहे. अजित पवारांना दर्गा-मशिदीशी काही देणं-घेणं नाही, पण आपल्याला आहे. हे लोक तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, त्यांना मतपेटीतून उत्तर द्यावं लागेल, असं ते म्हणाले. संविधानाची ताकद सांगताना पाकिस्तानवर टोला ओवैसी म्हणाले, पाकिस्तानच्या घटनेत एकाच धर्माचा माणूस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणताही भारतीय पंतप्रधान होऊ शकतो. कदाचित तो दिवस पाहायला मी नसेन, पण एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान नक्की बनेल, असा विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला. सोलापुरासाठी आश्वासनांची खैरात नई जिंदगी परिसराला उद्देशून बोलताना ओवैसी म्हणाले, हा परिसर सोलापुरचं हृदय आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार आणि शिंदे गट या भागाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. या भागाबद्दल चुकीचं बोललात तर मीही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शिक्षणावर भर, फातिमा शेख यांचा उल्लेख ओवैसी यांनी मुलींच्या शिक्षणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचं सांगितलं. पैसा किंवा भाषणाने ताकद येत नाही, चांगली वागणूक आणि शिक्षणामुळेच समाज मजबूत होतो, असं ते म्हणाले. ९ जानेवारी हा फातिमा शेख यांचा जन्मदिवस असल्याचं सांगत त्यांनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या शिक्षणातील योगदानाचाही उल्लेख केला.