मंचर : मंचर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, दि.२ रोजी तब्बल ७४,७७टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सकाळच्या सत्राला थंड वातावरण असल्याने सुरुवातीला मतदानाचा वेग मंद होता.अनेक मतदान केंद्रांवर पहिले दोन,अडीच तास संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजल्यानंतर वातावरण उबदार होताच मतदारांनी मतदान केंद्राकडे मोठ्या संख्येने धाव घेतली.दुपारी दोन वाजेपर्यंत पुन्हा थोडी मंदी आल्याचे दिसले. मात्र सव्वा तीननंतर मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा झपाट्याने वाढल्या.काही केंद्रांवर महिलांचीही विशेष गर्दी दिसून आली. संपूर्ण दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस व निवडणूक कर्मचाऱ्यांकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व मतदान केंद्रांवर प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. मतदानानंतर माहिती देताना सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव म्हणाले,“मंचर शहरातील मतदारांनी लोकशाहीचे भान ठेवून मोठ्या उत्साहात मतदान केले.संपूर्ण प्रक्रिया शांततेत पूर्ण झाल्याचा आम्हाला आनंद आहे.”उत्साहपूर्ण मतदानामुळे रविवार दि.२१ रोजी होणाऱ्या मतमोजणीबाबत सर्व पक्ष, उमेदवार आणि समर्थकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. आधी मतदान मग पूजा मंचर-मोरडेवाडी येथील वैभव बबनराव मोरडे यांचा विवाह झाला.त्यानिमित्ताने सत्यनारायण महापूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम मंगळवार दि.२ रोजी होते.परंतु आधी मतदान करून नंतर त्यांनी आपल्या घरच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली.