बीड : उसतोड मजुरांचं वास्तव फेसबुक आणि इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडणारा ‘ऊसतोड रिलस्टार’ गणेश डोंगरे याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताच्या क्षणी गणेशची पत्नी अश्विनी फेसबुकवर लाईव्ह होती आणि डोळ्यादेखत पतीचा मृत्यू पाहून ती लाईव्हमध्येच किंचाळली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. नेमकं काय घडलं? गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघेही ऊसतोड मजूर असून सोशल मीडियावर रिल्सद्वारे आपल्या आयुष्याचा संघर्ष दाखवत होते. दोन दिवसांपूर्वी ते लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊस सोडण्यासाठी गेले होते. वजन काट्याजवळ मोठी गर्दी असल्याने आपला नंबर येईपर्यंत ते थांबले होते. याचदरम्यान अश्विनी फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करत होती. कारखान्यातील परिस्थिती, उशीर, दंडाची अडचण याबाबत ती सांगत असतानाच ज्या ठिकाणी गणेश बसला होता, तिथे अचानक ऊसाची ट्रॉली उलटली. “बयो…” असा आक्रोश करत अश्विनी धावत सुटली, मात्र काही क्षणांतच गणेश ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली दबल्याने जागीच मृत्यूमुखी पडला. अवघ्या दोन मिनिटांच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये होत्याचं नव्हतं झालं. या अपघातामुळे डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश डोंगरे यांच्या पश्चात पत्नी अश्विनी आणि तीन लहान मुले आहेत. या कुटुंबाला साखर कारखान्याने मदत करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या जोडप्याच्या करूण अंताने संपूर्ण महाराष्ट्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. धनंजय मुंडेंची मदतीची घोषणा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी गणेश डोंगरे यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “अत्यंत सामान्य पण स्वाभिमानी ऊसतोड कुटुंबातील कामगार गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या अकाली निधनानंतर कुटुंब उघड्यावर पडू नये, याची काळजी आम्ही घेऊ,” अशी घोषणा त्यांनी केली. तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षण व पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडे लेखी मागणी करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. ऊसतोड कामगारांचे अपघात आणि त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.