गुरूग्राम – पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबमधील रहिवाशाला अटक करण्यात आली. ती महत्वपूर्ण कारवाई हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केली. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे आणि दहशतवादासाठी निधी पुरवणारे एक जाळे पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले. त्यामधील सदस्यांचे अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या परकी नेटवर्कशी लागेबांधे असल्याचेही निष्पन्न झाले. संबंधित सदस्यांपैकी एक असणाऱ्या संदीप उर्फ सन्नी (वय २२) याला हरियाणा एसआयटीने पंजाबमध्ये पकडले. प्राथमिक चौकशीत त्याने पंजाबमधील जाळ्याचा भाग असल्याची कबुली दिली. त्या जाळ्यातील ८ सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. संबंधित सदस्य पाकिस्तानस्थित म्होरक्यांना संवेदनशील लष्करी माहिती पुरवत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.