उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णायक डाव टाकत सत्ता स्थापनेचा मार्ग काढला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत शिंदेसेना महापालिकेत सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या घडामोडींमुळे भाजप सत्तेपासून दूर राहणार आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय काँग्रेसचा 1, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. 78 सदस्यांच्या सभागृहात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा आणि अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेचे संख्याबळ निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक निकालानंतर 1 अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात होते. संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सध्या अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेला अधिकृत पाठिंबा दिल्याची माहिती प्राध्यापक सुरेश सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घडामोडींची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, उल्हासनगर महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, ठामपा नगरसेवक योगेश जानकर आणि शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते. या घडामोडींमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.