पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 35 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख इनामदार यांच्याविरोधात खंडणी मागणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग 41 मधील रहिवासी सादिक कपूर यांनी जीवन संपवल्यानंतर त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून लष्कर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सादिक कपूर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये फारुख इनामदार यांचे नाव नमूद केले असून, त्यांच्या हातावरही इनामदार यांचे नाव लिहिलेले आढळून आले आहे. या प्रकरणात फारुख इनामदार यांच्यासह एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन व्यवहार आणि खंडणीच्या वादातून सादिक कपूर यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष निघत आहे. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून सादिक कपूर यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. सुसाईड नोटमध्ये तब्बल 38 जणांची नावे असून, सर्वांची भूमिका तपासण्यात येणार आहे. मृत सादिक कपूर हे मोक्का अंतर्गत आरोपी होते आणि त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल असून ते फरार होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.