मथुरा : उत्तरप्रदेशच्या मथुरा परिसरात मंगळवारी पहाटे यमुना एक्स्प्रेसवेवर दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. बस आणि कार मिळून ११ वाहने एकमेकांवर आदळून थरकाप उडवणारे अग्नितांडव घडले. त्यामध्ये होरपळून १३ जण मृत्युमुखी पडले. त्याशिवाय, ४३ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यमुना एक्स्प्रेसवेच्या आग्रा ते नोएडा मार्गिकेवर पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित अपघात घडला. धुक्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी असल्याने ८ बस, ३ कार एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर आगीचा भडका उडाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयांत हलवण्यात आले. अपघातानंतरच्या अग्नितांडवात बस आणि कार जळून खाक झाल्या. क्रेनच्या मदतीने ती वाहने एक्स्प्रेसवेवरून हटवण्यात आली. भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले. दोघांनीही स्वतंत्रपणे मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी २ लाख रूपयांची भरपाई जाहीर केली. त्याशिवाय, केंद्र आणि राज्य सरकारांकडून जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत उपलब्ध केली जाईल. त्यामुळे मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी ४ लाख रूपये, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत मिळेल.